गडहिंग्लज (प्रकाश चोथे) : शेवटपर्यंत कारखाना स्वबळावर चालविण्यासाठी प्रयत्न करणार असलो तरी पर्यायी व्यवस्था म्हणून कारखाना भाडे तत्वावर देता यावा, यासाठी सभासदांच्या ठरावाचे आवाहन संचालक मंडळाने विशेष साधारण सभेत केले. कोणत्याही चर्चेविना सभासदांनी त्यास मंजुरीही दिली. परंतू शासनाने नाकारलेली थकहमी आणि उणे नेटवर्थमुळे कोणत्याही वित्तीय संस्थेने कारखान्यास कर्जपुरवठा करण्यासाठी दाखविलेली असमर्थता यामुळे भांडवल उभारणीची मोठी समस्या संचालक मंडळासमोर आहे. शिवाय कारखाना भाडे तत्वावर चालविण्यासाठी द्यायचे झाले तरी त्यातील तांत्रिक गुंतागुंत आणि तयारीसाठी लागणाऱ्या कालावधीचा विचार केल्यास येणाऱ्या गळीत हंगामाच्या भवितव्यासमोर अंधार दिसत आहे.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची विशेष साधारण सभा ऑनलाइन पद्धतीने शनिवारी झाली. कारखाना व अर्कशाळा सहयोग/भाडे/भागीदारी/बीओटी तत्वावर चालविण्यास देणेबाबत विचार करण्याच्या एकमेव विषयासाठी ही सभा बोलाविण्यात आली होती. कारखान्याचे उपाध्यक्ष संग्रामसिंह नलवडे यांनी कारखाना स्वबळावर चालावा, याच उदात्त हेतूने संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असून ‘ब्रिस्क’सोबतचा करार घाईगडबडीत चुकीचा झाल्याचे सांगितले. तसेच पुढे मुश्रीफ यांनी नैतिक कर्तव्य म्हणून जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करायला हवा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

कारखान्याचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांनीही विविध बँकांना कर्जपुरवठा करण्यासाठी विनवणी केल्याचे सांगताना नामदार मुश्रीफ यांनाही कारखान्याला कर्जपुरवठा करण्यात पुढाकार घेण्याबाबत सांगितले. पण मुश्रीफ साहेबांनी मौन बाळगळल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषण संपवून बसताना शिंदे यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या गळ्यात हात टाकले, तर उपाध्यक्ष नलवडे यांनीही शहापूरकरांचे हात हातात घेतले. भूतकाळ विसरून कोणत्याही परिस्थितीत कारखाना चालू राहावा, यासाठी सर्वजण एकत्र आले,  सभासदांनीही एकमताने मंजुरी दिली, पण यंदाच्या गळीत हंगामाचे भवितव्य काय असणार, याबाबत अद्याप तरी कोणतीही स्पष्टता दिसून येत नाही.