‘स्वयंप्रभा मंच’ने महिलांचा आत्मविश्वास वाढवला : अनुराधा भोसले

0
149

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात महिलांना सकारात्मक कामात गुंतवून निकोप स्पर्धा घेत त्यांच्यात आत्मविश्वास कायम ठेवण्याचे काम ‘स्वयंप्रभा मंच’ने केले आहे, असे गौरवोद्गार अवनी आणि एकटी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधाताई भोसले यांनी काढले.

लॉकडाऊनच्या काळात विविध ऑनलाईन आणि काही प्रत्यक्ष स्पर्धा ‘स्वयंप्रभा मंच’ ने घेतल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील स्मृती भवन येथे नुकताच पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.

सारिकाताई बकरे यांनी स्वयंप्रभा मंचची भूमिका सांगिताना महिलांना सक्षम बनवणे, त्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगले पर्याय उभा करणे यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्येच ‘स्वयंप्रभा मंच’ ची स्थापना केली आणि कार्यास सुरुवात केली असून गेल्या पाच महिन्यांत अकरा फेसबुक लाइव्हचे सेशन घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करत  विविध चार प्रकारच्या स्पर्धा यामध्ये घेण्यात आल्याचे सांगितले.

या प्रसंगी पाककला तज्ञ मंजिरी कपडेकर, मेजवानी परिपूर्ण किचन महाराष्ट्र क्वीन प्राजक्ता पै-शहापुरकर, संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक महेश हिरेमठ, स्वराज्य जननी जिजामाता मालिकेचे दिग्दर्शक अजय कुरणे, गिर्यारोहक नितीन देवेकर, ग्राफिक डिझाइनर ऐश्वर्या तेंडुलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेच्या मार्गदर्शिका विद्या बकरे, कार्यकारिणी सदस्या प्रियांका देशमुख, वर्षा वायाचळ, शीतल तांबेकर यांच्यासह स्पर्धक आणि पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ- पवार यांनी केले. तर आभार सोनाली जाधव यांनी मानले.