सोलापूर (प्रतिनिधी) : अक्कलकोट (ता. सोलापूर) येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर २ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाताळ, दत्त जयंती आणि नववर्षाच्या सलग सुट्ट्या आल्यानं या काळात भक्तांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त महेश इंगळे यांनी दिली.

२४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.  २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्रीपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरता मंदीराकडे येण्याचे टाळावे, असं आवाहन मंदिर समितीनं केलं आहे.

कोल्हापुरातील भक्तांमध्ये नाराजी

कोल्हापूरसह जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचे असंख्य भक्त आहेत. मागील काही वर्षांपासून कोल्हापुरातील शेकडो भक्तांनी दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी अक्कलकोटला जाऊन महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचा उपक्रम सुरू केलाय. विशेष म्हणजे यामध्ये मध्यमवयीन आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सामिष भोजन, पार्ट्या, मद्यपान करून ३१ डिसेंबर साजरा केला जातो. मात्र या भक्तांनी या अनिष्ट गोष्टींना फाटा देऊन श्री स्वामी चरणी लीन होणे पसंत केले आहे. अनेक वर्षे सुरू असलेला हा उपक्रम यावर्षी मात्र राबविता येणार नसल्याने भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.