कोल्हापूर (प्रतिनिधी)  : जल जीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ या घोषवाक्यानुसार पाणीपुरवठा योजनांचे काम सुरू आहे. देशातील नळ पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता सुधारणे आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे या उद्देशाने तसेच ‘जल जीवनसर्वेक्षण २०२३’ चा भाग म्हणून जलशक्ती मंत्रालय, केंद्र शासनव्दारे दि. १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘स्वच्छ जलसे सुरक्षा’ हे अभियान राबविले जाणार आहे.

‘स्वच्छ जलसे सुरक्षा’ या अभियान अंतर्गत अस्तित्वातील सर्व नळ पाणीपुरवठा योजना व रेट्रोफिटिंग करण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रमुख स्त्रोतांचे तसेच नवीन योजनांकरिता स्त्रोतांचे काम पूर्ण झाले असल्यास अथवा स्त्रोत अस्तित्वात असल्यास त्याचे देखील ‘हर घर जल’ या ॲपद्वारे जीओ टॅगिंग पूर्ण करणे, प्रत्येक नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोतांची मान्सून पश्चात कालावधीमधील रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करणे, क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे पाणी तपासणी करण्यासाठी गावस्तरावर नियुक्त केलेल्या महिलांना प्रशिक्षण देऊन पाणी गुणवत्ता तपासणी पूर्ण करणे, अभियानादरम्यान रासायनिक व जैविक तपासणीसाठी पाणी नमुने प्रयोगशाळेत पाठवून वरिष्ठ भू वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कोल्हापूर यांच्याद्वारे अभियान कालावधीत प्राप्त होणाऱ्या या सर्व पाणी नमुन्यांची रासायनिक व जैविक तपासणी पूर्ण करून त्याची नोंद केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करणे, असे उपक्रम राबविले जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्हयामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची जैविक व रासायनिक तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय पाणी परिक्षण संच ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आलेले आहेत. या परिक्षण संचाव्दारे पाण्याची तपासणी करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ५ महिलांची निवड करण्यात आली आहे. रासायनिक व जैविक क्षेत्रीय परिक्षण संचाद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणे व तपासणी अहवालाच्या नोंदी ठेवणे याबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पाण्याची रासायनिक तपासणी करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींना रासायनिक परिक्षण संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या विभागांनी समन्वयाने काम करून हे अभियान यशस्वी करणेसाठी शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करावी. गावस्तरावरील पाणी नमुने तपासणीसाठी वेळेत प्रयोगशाळेत पोहचविणे व उपलब्ध क्षेत्रीय पाणी परिक्षण संचाव्दारे स्त्रोतांची तपासणी करणे याची खबरदारी ग्रामसेवक आणि जलसुरक्षक यांनी घ्यावी. या उपक्रमाचे सनियंत्रण तालुकास्तरावरून गटविकास अधिकारी यांनी करावे, अशा सूचना जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या आहेत.