कोल्हापूर (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीज बिले माफ करावीत, अशी मागणी करीत  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड वीज कार्यालयात आज (गुरुवार) अक्षरश: राडा केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत मोठ्या प्रमाणात वादावादी झाली.

उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिल माफीवरून घुमजाव करून बिले भरावीच लागतील असे स्पष्ट केल्यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावरूनच उग्र आंदोलनाचा इशारा दिला आणि वाढीव वीज बिले न भरण्याचे आवाहन केले होते.

आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथील वीज कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना जाब विचारत जोरदार निदर्शने केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची झाली. विरोध डावलून कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालयासमोरच कार्यकर्त्यांनी वाढीव वीज बिलांची होळी केली.