रांगोळी (प्रतिनिधी) : महापुरामुळे नुकसान झालेल्या उसाची लवकर तोडणी  करण्यात यावी. चालू वर्षी गाळप होणाऱ्या उसाला ३३०० रूपये दर द्यावा,  अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (बुधवार) करण्यात आली. याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, मॅनेजर मनोहर जोशी  यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पूरबाधित ४० टक्के, तर  चांगल्या ६०  टक्के ऊस तोडण्याच्या आदेशाचे पालन कारखान्याने करावे. तसेच मशीनने  तोडलेल्या उसाच्या वजनात ५ टक्के वजावट करू नये. साखर आयुक्त यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे १  टक्के वजावट करावी.  यावर मॅनेजर मनोहर जोशी यांनी  तातडीने पूरबाधित क्षेत्रातील ऊस तोड सुरू करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वैभव कांबळे,  बळीराम माकणे, सुशील पाटील, रमेश पाटील,  आप्पासाहेब एडके,  सुदर्शन पाटील,  एम. आर. पाटील,  जयकुमार हुपरे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.