‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते-पोलिसांत जोरदार झटापट

0
107

सांगली (प्रतिनिधी) : एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (शुक्रवार) वसंतदादा कारखाना चालवणाऱ्या दत्त इंडिया कंपनीवर धडक मारली. गव्हाणीत उड्या मारण्यासाठी बॅरिकेटस्‌ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

दरम्यान कंपनीचे उपाध्यक्ष मृत्यूंजय शिंदे, शरद मोरे आदींनी आंदोलनस्थळी येऊन जिल्हाध्यक्ष महेश खराडे व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली. सध्या २५०० रूपयाप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. उर्वरीत ३९२ रूपयाचा दुसरा हप्ता दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाईल. तसेच एकरकमी एफआरपी दिली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्ह्यात साखर हंगाम सुरु होण्यापूर्वी कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एफआरपीबाबत बैठक झाली होती. त्यावेळी एकरकमी एफआरपी देण्याचे कारखान्यांनी जाहीर केले होते. परंतू जिल्ह्यात सोनहिरा, उदगिरी शुगर, निनाईदेवी कारखाना वगळता इतर साखर कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिली नव्हती. सर्वांनी २५०० रूपयेप्रमाणे पहिला हप्ता काढला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरु केले आहे. एकरकमीसाठी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्याचा इशारा संघटनेने दिला होता. तसेच आज दत्त इंडियाच्या गव्हाणीत उड्या मारण्याचे आंदोलन जाहीर केले होते. गव्हाणीत उड्या टाकण्याचा इशारा दिल्याने कारखाना स्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस्‌ टाकून रस्ता अडवला होता. दुपारी बाराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांना कारखान्याच्या मुख्य गेटवरच पोलिसांनी अडवले. त्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.