शिये येथे तृतीयपंथीयाचा संशयास्पद मृत्यू…

0
3280

टोप (प्रतिनिधी) : शिये, रामनगर (ता. करवीर) येथे तृतीयपंथीच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घरातील सोन्याचे दागिने लंपास असून दराला बाहेरून कडी होती. त्यामुळे या तृतीयपंथीचा मृत्यू नैसर्गिक की अन्य कोणत्या कारणासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा (वय ४२, सध्या रा. रामनगर शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले ) असे त्याचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता त्यांना संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हे गेली दहा वर्षे रहात आहेत. तृतीयपंथी असल्याने त्यांनी आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून वाहून घेतले होते. शिये येथेच त्यांनी घर खरेदी केले होते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने असल्याची परिसरात चर्चा आहे. आज सकाळी अमृत पवार हे नाष्टा घेऊन घरी आले. त्यांनी सतीश पवार यांना झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना सतीश मृत अवस्थेत आढळून आले.

याबाबत त्यांनी तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तीन वर्षापूर्वी सतीश पवार यांच्या घरात मोठी चोरी झाली होती. आजचा मृत्यू नैसर्गिक असेल तर सोन्याचे दागिने आणि घराला बाहेरून कडी हे प्रश्न अनुत्तरित आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि. किरण भोसले करीत आहेत.