वाशी येथे तिघा संशयितांकडून टेहळणी

0
5902

राशिवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वाशी येथील कुमार विद्यामंदिरच्या आवारात तीन अनोळखी व्यक्ती टेहळणी करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या संशयास्पद हालचालीवरून काही सतर्क नागरिकांनी त्यांची चौकशी केली. त्यांना योग्य उत्तरे देता न आल्याने आणि लोकांची वाढती गर्दी पाहून तिघा संशयितांनी तेथून पळ काढला.

गुरुवारी दुपारी  ४ वाजता कुमार विद्यामंदिर वाशी या शाळेच्या आवारात तीन अनोळखी व्यक्ती घुटमळत असल्याचे निदर्शनास आले होते. या संशयितांनी, ‘आम्ही परप्रांतीय आहोत, आम्ही ब्लॅंकेट विकतो आणि उजळाईवाडी येथे राहतो अशा प्रकारची उत्तरे दिली होती. सध्या जिल्ह्यात मुले पळवणारी टोळी सक्रिय असल्याच्या वृत्तामुळे सतर्क नागरिकांनी त्या दृष्टीने त्यांची चाचपणी केली, पण योग्य उत्तरे न देता संशयितांनी दोन दुचाकीवरून पळ काढला.

नागरिकांनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले. शाळांमध्ये पालकांची बैठक घेऊन त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. मुलांना एकटे न सोडण्याच्या तसेच अनोळखी व्यक्तींकडून मुलांनी काहीही न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. व्हॉट्सअपवरून वाशी, नंदवाळ, शेळकेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे संदेश व्हायरल करण्यात आले आहेत. करवीर पोलीस ठाण्यास याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीनेही नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

………….

‘लाईव्ह मराठी’साठी राशिवडेहून कृष्णा लाड