कोल्हापूर (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यत सरकारने कोणत्याही प्रकारची नोकरभरती करु नये, अन्यथा मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी आज ( बुधवार) पत्रकार परिषदेत दिला.

पाटील म्हणाले की, कोल्हापुरात २३ सप्टेंबरला झालेल्या राज्यव्यापी गोलमेज परिषदेत १० ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती. यावेळी मराठा आरक्षणासह विविध ठराव  मांडण्यात आले होते. त्यानंतर या गोलमेज परिषदेची दखल घेऊन राज्य शासनाने या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबईत मराठा संघटनांबरोबर बैठक घेतली. यामध्ये गोलमेज परिषदेतील १० मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे १० ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र, सरकारने यापुढे मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारची नोकर भरती करू नये अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेला मराठा समन्वय समितीचे विजयसिंह महाडिक, मराठा आरक्षण संघर्ष समितीचे भरत पाटील, सचिन साठे, शिवाजी लोंढे, भास्करराव जाधव, दिग्विजय मोहिते उपस्थित होते.