‘आजरा अर्बन’च्या चेअरमनपदी सुरेश डांग तर व्हा. चेअरमनपदी शैलजा टोपले बिनविरोध

0
262

आजरा (प्रतिनिधी) : आजरा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी सुरेश डांग यांची तर व्हा. चेअरमनपदी शैलजा टोपले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज (बुधवार) बँकेच्या मुख्य कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी व विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षस्थानी होते.

बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. आज मल्टिस्टेट कायद्यानुसार झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अरुण काकडे यांनी बिनविरोध निवडलेले संचालक यांच्या यादीचे वाचन केले. सर्व नूतन संचालकांचा काकडे यांनी सत्कार केला. संचालक विलास नाईक यांनी चेअरमनपदासाठी डांग यांचे नाव सुचविले. त्याला अशोक चराटी यांनी अनुमोदन दिले, तर व्हा. चेअरमन पदासाठी शैलजा टोपले यांचे नाव प्रकाश वाटवे यांनी सुचविले. त्यास संचालक रमेश कुरुणकर यांनी अनुमोदन दिले. या वेळी दोघांच्याही निवडी बिनविरोध करण्यात आल्या.

या वेळी आण्णा भाऊ समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले की, बँकेपुढे शेड्युल्ड बँकेकडे जाण्याचे अहवान आहे. ठेवींचा टप्पा पूर्ण करणे तसेच चांगले कर्जदार शोधणे, वसुली करणे, अशी आवाहने असून सर्वांनी याला साथ देणे गरजेचे आहे. प्रत्येकजण अध्यक्ष आहे असे समजून काम करण्याचे आवाहन केले.

बँकेचे अधिकारी प्रशांत गंभीर यांनी प्रास्ताविक केले. या वेळी संचालक डॉ. अनिल देशपांडे, प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोस्कर, मारुती मोरे, आनंदा फडके यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते.