सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट : चर्चांना उधाण

0
29

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. परमबीर सिंग यांनी महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.   

सुप्रिया सुळे यांनी या भेटीनंतर केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आपण सोनिया गांधी यांची भेट घेतली. तुमच्यासोबत चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असतं. तुमच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी खुप खुप आभारी आहे.

दरम्यान, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कारभारात याआधी सोनिया गांधी यांनी हस्तक्षेप केला नव्हता. पण आता सरकारवर होत असलेल्या विविध आरोपामुळे सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भेटीची चर्चा होऊ लागली आहे.