कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेल्या वस्तुंची जिल्हा परिषदेच्या आवारात ९ ते ११ नोव्हेंबर प्रदर्शन व विक्री होणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले. जिल्हा परिषदेच्या दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीसाठी पणत्या, मेणबत्या, आकाश कंदील, भेटवस्तू तयार केल्या आहेत. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही या वस्तुंचे प्रदर्शन तीन दिवस भरविण्यात येणार आहे. या वस्तू विकत घेवून विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे, असेही मित्तल म्हणाले.

जिल्ह्यातील एकूण २३ दिव्यांग शाळांपैकी ७ कार्यशाळा आहेत. कार्यशाळेतील १८ वर्षापुढील विद्यार्थी विविध वस्तू तयार करतात. कार्यालयीन फाईल, राख्या, दिवाळीचे साहित्य बनवत असतात. दिवाळीसाठी यावर्षी आकर्षक आकाशदिवे, नक्षीदार पणत्या, उटणं, भेटवस्तू या विद्यार्थ्यांनी तयार केल्या आहेत. या वस्तू नक्की विकत घ्या आणि त्यांच्या कलेला दाद द्या, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे सांगितले.