कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरातील महापालिकेची शाळेला आरक्षित असलेली जागा हडप करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रस्ताव प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी नामंजूर केला, असा गंभीर आरोप माजी महापौर सुनील कदम यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केला. या वेळी त्यांनी महापालिकेत जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी सत्तेचा गैरवापर करून स्वतःचा स्वार्थ साधताना शहरवासियांचे प्रचंड नुकसान केल्याचे केल्याचेही सांगितले.

माजी महापौर सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असून शहरातील विकासाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. थेट पाईपलाईन, सांडपाणी प्रकल्प, कचरा प्रकल्प, रस्ते प्रकल्प या सर्वांत भ्रष्टाचार झाला आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या मिळकती वरील घरफळा चुकल्याने शहरातील २००० च्या वर मिळकतींना शून्य तसेच चुकीचा घरफळा आकारला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे घरफाळ्यातूनच जवळजवळ दोनशे कोटीपर्यंत नुकसान झाले आहे.

दोन्ही मंत्री महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणत असून  काही अधिकाऱ्यांना थेट मारहाण केली जात असल्याचा आरोपही सुनील कदम यांनी केला.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामधाम समोरील महापालिकेच्या मालकीची आणि शाळेसाठी आरक्षित असलेली जागा स्वतः हडप करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुनील कदम यांनी करताना याबाबतचा प्रस्ताव मात्र प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी नामंजूर केला असल्याचे सांगितले. तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यावरील बी मॅट, आदर्श वस्त्रम याबाबतीतील आरोप खोटे असल्याचे कागदपत्रासह त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्र्यांच्या बगलबच्च्यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यावरून केलेल्या आरोपाबाबत पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही कदम बंधूंनी सांगितले. तसेच भीमा उद्योग समूहाकडे असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांची यादी ही त्यांनी दाखवली. आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्री फक्त ‘ढपला’ पाडण्याचे उद्योग करीत असल्याचा आरोप केला.

या वेळी किरण नकाते, विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके उपस्थित होते.