कोल्हापूर (प्रतिनिधी) : पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहरातील साळोखेनगर येथे असलेल्या डी. वाय. पाटील विद्यानिकेतच्या इमारतीचा सुरुवातीपासून ते आतापर्यंत सात वर्षे घरफाळाच भरला नसल्याची माहिती माजी महापौर सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

 याबाबत कदम बंधू म्हणाले की, पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्या सयाजी हॉटेल आणि ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्कच्या मिळकतीचा घरफाळा बुडवला. त्याचप्रमाणे साळोखेनगर येथील सुरु असलेल्या डी. वाय. पाटील विद्यानिकेतनच्या इमारतीचा घरफाळाही बुडवला आहे. मुळात या शाळेची इमारत महापालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेत बांधली आहे. याठिकाणी 2014 पासून हे महाविद्यालय सुरू केले आहे. या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र अद्याप घेतले नसल्याने घरफाळाच लागू केलेला नाही. अशा प्रकारे जवळजवळ दीड लाख चौरस फुटाचे बांधकाम केलेल्या इमारतीचा गेली सात वर्षे घरफाळा भरला नसल्याचे माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेस वेळी आशिष ढवळे उपस्थित होते.