नवी दिल्ली : महिलांच्या कुस्तीमध्ये जागतिक स्तरावर भारताचा नावलौकिक वाढविण्यात गीता आणि बबिता फोगाट या बहिणींची कामगिरी कारणीभूत आहे. या दोघींच्या प्रेरणादायी जीवनावर ‘दंगल’ हा हिंदी चित्रपट बनविण्यात आला जो खूपच यशस्वी ठरला. या चित्रपटामुळेच या दोघी बहिणींना ‘दंगल गर्ल्स’ संबोधण्यात येऊ लागले. त्यांच्याच पावलांवर पाउल ठेवून कुस्तीत नावलौकिक मिळविण्याचा प्रयत्न करीत असलेल्या त्यांच्या मामेबहिणीने मात्र कुस्तीत पराभव झाल्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रितिका फोगाट असे तिचे नाव आहे. यामुळे फोगाट परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

गीता-बबिताच्या पावलावर पाऊल ठेवत रितिका फोगाटने कुस्तीच्या आखाड्यात प्रवेश केला. राजस्थानमधील भरतपूर येथे १२ ते १४ मार्च दरम्यान राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत पार पडली. होती. सब ज्युनिअरमधील ५३ किलो गटात १७ वर्षीय रितिकाने भाग घेतला होता. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिचा एक गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले होते. अंतिम सामन्यात पराभव झालेल्या रितिकाला पराभव पचवता आला नाही. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने असे टोकाचे पाऊल उचलल्याने फोगाट परिवार हवालदिल झाला आहे.

रितिका मागील ५ वर्षापासून महावीर फोगाट यांच्याकडे कुस्तीचे धडे घेत होती. चरखी दादरीचे पोलीस उप अधीक्षक रामसिंग बिष्णोई यांनी सांगितले की, पराभव सहन न झाल्याने रितिका फोगाटने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत. मात्र, आम्ही आणखी याचा तपास करीत आहोत.