धर्मशाला (वृत्तसंस्था) : बॉलीवूडसाठी हे वर्ष अत्यंत निराशाजनक ठरले आहे. इरफान खान, ऋषी कपूर या गुणी अभिनेत्यांचा कर्करोगाने मृत्यू झाला तर उमदा अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली. सुशांतसिंगबरोबर ‘कैपोचे’ चित्रपटात काम केलेल्या आसिफ बसरा या अभिनेत्याने आज (गुरुवार) आत्महत्या केली. ते ५३ वर्षांचे होते. हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धर्मशाला येथील मॅकलॉडगंजमधील जोगीबाडा रोडवरील कॅफेजवळ असलेल्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आज दुपारी निदर्शनास आला.

पोलीस अधीक्षक विमुक्त रंजन यांनी सांगितले की, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मागील ५ वर्षांपासून बसरा हे मॅकलॉडगंज येथे भाड्याच्या घरात एक परदेशी मैत्रिणीसोबत राहात होते. आज दुपारी ते कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. घरी आल्यावर त्यांनी कुत्र्याच्या गळ्यातील दोराने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

बसरा यांच्या आत्महत्येने बॉलीवूडला धक्का बसला आहे. त्यांनी ‘वो, ब्लॅक फ्रायडे, परजानिया, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटांंसह काही वेब सिरीजमध्येही काम केले आहे.