पन्हाळा (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील शाळकरी मुलाने पन्हाळागडावरील तीन दरवाजा तटबंदी परिसरातील अंधारबाव येथून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. जरगनगर येथील अभिषेक दिलीप करंजे (वय १३) असे या मुलाचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सातवीत शिकणारा अभिषेक करंजे हा शुक्रवारी दुपारी पन्हाळगडावर आला होता. त्याच्या सोबत शाळेचे दप्तर होते. अंधबाव येथील तटबंदीवर बसला असता स्थानिक व्यावसायिक व तरुणांनी त्याची विचारपूस केली. एवढ्या रात्री अंधारात का बसला आहेस अशी विचारणा केली असता, ‘माझे नातेवाईक पन्हाळावर येत आहेत आणि मी त्यांची येथे वाट बघत आहे’, असे त्याने उत्तर दिले. अभिषेकच्या अंगावर कोल्हापुरातील एस. एम. लोहिया हायस्कूलचा गणवेश होता. त्याच्या दप्तरामध्ये दुर्गा क्लासेस असे लिहिलेली वही होती.

थोड्याच वेळामध्ये अंधारबाव परिसरातील तटबंदीवरून त्याने खाली उडी मारली. तथापि तो पन्हाळ्याच्या  स्मशानभूमीच्या शेडवर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फसला. स्थानिक तरुणांनी ही घटना पाहिल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्याला तटबंदीच्या खालून एका चादरीत घालून वरती आणले. पन्हाळा ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारानंतर त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. पन्हाळा पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास पन्हाळा पोलीस निरीक्षक अरविंद काळे करीत आहेत.

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालक नसल्याने वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. त्या दरम्यान १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला असता एक तास उशिराने रुग्णवाहिका पन्हाळागडावर दाखल झाली.