कोल्हापूर (प्रतिनिधी) :  अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूराने नदीकाठच्या संपूर्ण पिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. अशा नदीकाठच्या  सभासद शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी राजाराम कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. त्याच क्षेत्रात ऊसाची पूर्नलागण करण्यासाठी ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांनी दिली.

महादेवराव महाडिक म्हणाले की, शेतकऱ्यांचे जीवनमान ऊसाच्या नगदी पीकावर अवलंबुन आहे. परंतू संपूर्ण ऊस पिक महापुराने बाधित झाल्यामुळे काढून टाकण्याशिवाय अन्य पर्याय उरलेला नाही. म्हणून राजाराम कारखान्याचे जे सभासद बाधित ऊस पिक काढून त्याच क्षेत्रात ऊसाची पूर्नलागण करण्यासाठी इच्छुक आहेत. अशा सभासद शेतकऱ्यांना कमाल १ एकर मर्यादीत क्षेत्राकरीता क्रेडिटवर को- ८६०३२, ९२००५, १०००१, ९०५७, ८००५, ३१०२ या जातीचे ऊस बियाणे अथवा ऊस रोपे क्रेडिटवर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

तसेच मागील वर्षातील कोरोना परिस्थिती आणि पुरस्थितीचा विचार करुन संचालक मंडळाने सर्वच सभासदांना प्रति शेअर्स ५ किलो सवलतीच्या दरातील साखर देण्याचा निर्णय देखील घेतला आहे. कारखान्यामार्फत सुरु असलेल्या विविध ऊस विकास योजनांची माहिती पत्रकाव्दारे देणेचे काम शेती विभागामार्फत सुरु असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना माहितीसह मास्क, किटचे वाटप देखील सर्व सभासदांना केले जात असल्याचे महाडिक यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन  दिलीप पाटील, व्हाईस चेअरमन  वसंत बेनाडे, संचालक माजी आ. अमल महाडिक, सर्व संचालक, कार्यकारी संचालक  प्रकाश चिटणीस उपस्थित होते.