परिषदेआधीच ऊस दराची बैठक…

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस परिषदेत एफआरपी जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटवू नका, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या (शनिवार) कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृहात ही बैठक होणार आहे. या बैठकीला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खा. संजय मंडलिक, माजी आ. चंद्रदीप नरके यांच्यासह कारखानदार उपस्थित राहणार आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषद २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपुरात होणार आहे. दरम्यान, आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी एफआरपी दर जाहीर झाल्याशिवाय कारखानदारांनी हंगाम सुरू करू नये, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल अशी भूमिका संघटेनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी स्वाभिमानी आणि कारखानदारांची बैठक उद्या घेतली जाईल, असे आश्वासन दिले.