पेठवडगाव (प्रतिनिधी) : ऊस गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले तरी अद्याप परिसरातील बहुसंख्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस शेतातच असल्यामुळे साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून लवकरात लवकर ऊस गाळप करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

दिवाळी झाल्यानंतर साखर कारखान्याचे बॉयलर पेटले. त्यानंतर ऊसतोड सुरू झाली. हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले आहेत; परंतु ऊस तोडणी व वाहतूक संथगतीने सुरू आहे अनेक ठिकाणी ऊस अद्याप शेतातच असल्यामुळे शेतकरी साखर कारखान्यांनी ऊस लवकरात लवकर न्यावा, यासाठी धावपळ करत असल्याचे चित्र दिसत आहे.

उसाची लागण केल्यानंतर तो गाळपासाठी तयार होण्यासाठी १५ ते १६ महिन्यांचा कालावधी लागतो. ऊस लागवडीचा खर्च हा मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस लवकरात लवकर साखर कारखान्यांना पाठवण्याची घाई असते; परंतु साखर कारखान्यांकडून ऊस तोडणीचे नियोजन व्यवस्थित झाले नसल्यामुळे ऊस शेतातच असल्याचे दिसून येत आहे.

ऊस तोडणी मुकादम व टोळ्या मनमानी करत असल्यामुळे त्यांना एकरी दहा हजार रुपये एवढी उचल ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा नाईलाज होत आहे. ऊस तोडणी मजुरांची संख्या कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच ऊसतोड करावी लागते, तसेच साखर कारखान्यांची मशिनरी वापरावी लागते; परंतु छोट्या शेतकऱ्यांना ही मशिनरी परवडत नसल्यामुळे त्यांची अडचण होते. काही ठिकाणी थंडीमुळे उसाला तुरे फुटू लागले असून, त्यामुळे वजनात घट होते व उतारा कमी मिळतो अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

यंदा पाऊस वेळेवर झाल्याने तसेच पूर परिस्थिती न उद्भवल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे परंतु साखर कारखाने मात्र कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस तोडण्यापेक्षा हद्दी बाहेरील ऊस कमी दराने तोडून त्याचे गाळप करत असल्यामुळे शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. साखर कारखान्यांनी वेळेवर ऊसतोड करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.