टोप येथील आगीत ११ एकरातील ऊस खाक : लाखोंचे नुकसान (व्हिडिओ)

0
696

टोप (प्रतिनिधी) : टोप (ता. हातकणंगले) येथील दक्षिणवाडी रोडवरील आंब्याचा मळा परिसरातील सुमारे ११ एकरातील उसाला आग लागल्याचे आज (शनिवार) शेतकऱ्यांच्या लक्षात आले. काही शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न केले, पण त्यात यश आले नाही. परिसरातील सगळाच ऊस टप्याटप्याने पेटत जाऊन खाक झाला. यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 

ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. काही वेळापूर्वी लाईट जोडणीचे काम झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. हातातोंडाशी आलेला ऊस अशा पद्धतीने पेटल्याचे पाहून शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या क्षेत्रातील बाळासाहेब चौगले, भगवान चौगले, चंद्रकांत चौगले, वसंत चौगले, आकाराम चौगले, कृष्णात चौगले, रोहित चौगले, भिमराव चौगले, रोहित चौगले, शंकर चौगले, विठ्ठल चौगले, नारायण चौगले या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.

जळालेल्या उसाचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाचे सध्या सुरू आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बावडा येथील शेती अधिकारी आवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या परिसरास भेट देऊन जळालेला ऊस लवकरच नेला जाईल असे सांगितले. शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.