कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जयसिंगपूर येथे २ नोव्हेंबर रोजी होणारी १९ वी ऊस परिषद ऑनलाईन होणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (शुक्रवार) स्वाभिमीनीच्या पदाधिकाऱ्यांना हा प्रस्ताव दिला. तो पदाधिकाऱ्यांनी मान्य केला. म्हणून यावेळची ऊस परिषद जयसिंगपूरमधील विक्रमसिंह मैदानाऐवजी कल्पवृक्ष गार्डनमध्ये ऑनलाईन व्हच्युअल माध्यमातून होणार आहे. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिंदर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 

गेल्या दोन आठवड्यापासून संघटनेतर्फे ऊस परिषदेची तयारी सुरू आहे. जनजागृतीही केली जात आहे. दरम्यान, परिषदेला परवानगी मिळावी, यामागणीसाठी प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी देसाई यांची भेट घेतली.

यावेळी प्रा. पाटील म्हणाले, प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदाही ऊस परिषद होणारच आहे. जोपर्यंत ऊस परिषद होत नाही आणि त्यामध्ये दर ठरत नाही, तोपर्यँत कारखान्यांची धुराडी पेटू दिले जाणार नाही. ऊस परिषदेकडे राज्य, देशातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले असते. म्हणून सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर अशा नियमांचे पालन करण्याचे बंधन घालून परिषदेला परवानगी द्यावी.

यावर जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, शंभर वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेले शिवसेनेचा दसरा मेळावाही ऑनलाईन झाला आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठीच ऊस परिषदही ऑनलाईन घ्यावी.

तसेच यंदाच्या हंगामातील उसाचा दर निश्चित न करता पालकमंत्र्यांनी आपला कारखाना कसा सुरू ठेवला, असा प्रश्न जनार्दन पाटील, मादनाईक यांनी विचारला. त्यांनी कारखाने बंद ठेवावेत, अन्यथा रस्त्यावरचा संषर्घ अटळ आहे, असा इशाराही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चर्चेवेळी दिला.

स्वाभिमानीचे सावकर मादनाईक, जनार्दन पाटील, मिलिंद साखरपे, शैलेश आडके, वैभव कांबळे, सागर मादनाईक, आणाप्पा चौगुले आदी उपस्थित होते.