इचलकरंजी (प्रतिनिधी) : वाढत्या पाणी प्रदूषणास जबाबदार असल्याच्या कारणावरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाने आज (शुक्रवार) इचलकरंजी शहरातील ९ प्रोसेसना काम बंद ठेवण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यापैकी काही प्रोसेस सुरु असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या समितीने आज शहरातील सायझिंग व प्रोसेसची पाहणी केली. यामध्ये संबंधित प्रोसेस बंद असल्याचे निदर्शनास आले. मात्र समितीने अचानक भेटी देऊन पाहणी केल्याने सायझिंग व प्रोसेसधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

गेल्या काही वर्षांपासून पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. इचलकरंजी शहर व परिसरातील कापडावर प्रक्रिया करणार्‍या प्रोसेसच्या रसायनमिश्रित सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठी भर पडत चालल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने इचलकरंजी आणि परिसरातील उद्योगाची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करुन सुधारणा करण्यासंदर्भातील नोटीसा बजावल्या होत्या. परंतु आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून आल्याने फेब्रुवारी महिन्यात इचलकरंजी शहरातील ९ प्रोसेसना व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटीसा बजावल्या होत्या. नोटीसा देऊनही काही प्रोसेस, सायझिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने शासन नियुक्त समितीने आज शुक्रवारी शहरातील अमित, पवन, भारत, श्रीराम, विरभद्र यासह ९ प्रोसेसची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी संबंधित सर्वच प्रोसेस बंद असल्याचे स्पष्ट झाले.

या पथकात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, सहाय्यक अधिकारी एस. बी. मोरे, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, नगरपरिषदेचे जलअभियंता सुभाष देशपांडे व अंकिता मोहिते यांच्यासह अधिकार्‍यांचा समावेश होता.