दुबई (वृत्तसंस्था) :  आयपीएलनंतर आता सर्वांना टी-20 वर्ल्ड कपच्या ) स्पर्धेचे वेध लागले आहेत. टी-२० वर्ल्डकप कोरोनामुळे 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत युएई आणि ओमन या देशांमध्ये खेळवला जात आहे. ठिकाण बदललं असलं तरी स्पर्धेची उत्सुकता मात्र तिळभरही कमी झालेली नाही.

17 ऑक्टोबर रोजी पहिला सामना पार पडणार असून अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबूधाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीत दोन ग्रुप आहेत. ग्रुप ए मध्ये आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबिया तर ग्रुप बी मध्ये ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलँड आणि बांगलादेश हे संघ आहे. दोन्ही ग्रुपमध्ये प्रत्येकी दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

ग्रुप ए मधील पहिली लढत अबुधाबी मैदानावर २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. तर अखेरची लढत ६ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या लढतीने होणार आहे.

ग्रुप बी मधील पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्या लढतीने होईल. ही लढत दुबईत होणार आहे. या ग्रुपमधील अखेरची लढत देखील भारताच्या सामन्याने होणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी भारत पात्रता फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत लढणार आहे.

या भव्य स्पर्धेची विजयाची रक्कमही तितकीच भव्य आहे. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार टी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला 1.6 मिलियन डॉलर म्हणजेच 12.2 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 6.1 कोटी आणि उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 4 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी भारतीय रुपये मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर (भारतीय चलणानुसार 42 कोटी) इतकी बक्षीसी रक्कम सहभागी संघांमध्ये वाटप केली जाणार आहे.