हैदराबाद (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोने नवा इतिहास रचला आहे. इस्रोच्या श्रीहरीकोटा केंद्रावरून पहिले खासगी रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे रॉकेट स्कायरूट एरोस्पेस कंपनीचे आहे. या रॉकेटचे नाव विक्रम सबऑर्बिटल असे आहे. निर्धारित लक्ष्यानुसार हे रॉकेट अवकाशात १०० किलोमीटर प्रवास करेल आणि त्यानंतर ते समुद्रात कोसळणार आहे.

या रॉकेटने सकाळी ११.३० वाजता सतीश भवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी झेप घेतली. या रॉकेटला दिलेले विक्रम एस हे नाव भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरून दिले आहे. हैदराबादमधील स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने २०२० मध्ये या रॉकेटच्या निर्मितीला सुरुवात केली होती. ही कंपनी स्टार्ट अप योजनेंतर्गत सुरू झाली होती. या कंपनीला इस्रो आणि इन स्पेस या केंद्रानेही मदत केली. या रॉकेटने दोन भारतीय आणि एक आंतरराष्ट्रीय ग्राहकाचे पेलोड्स घेऊन यशस्वी प्रक्षेपण केले.

या रॉकेटची निर्मितीच जास्तीत जास्त १०१ किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. त्यामुळेच शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) प्रक्षेपण झालेले हे रॉकेट १०० किमी अंतर पार करून समुद्रात कोसळेल. या रॉकेटचे वजन ५४५ किलो इतके आहे.

व्यावसायिक अंतराळ मोहिमांना प्रोत्साहित करणाऱ्या भारताची नोडल एजन्सी इन-स्पेसनने विक्रम-एस सबऑर्बिटल यानाच्या प्रक्षेपणाला मंजुरी दिली होती. ‘प्रारंभ’ असे या मोहिमेचे नाव होते. विक्रम सीरीजच्या रॉकेटमुळे भविष्यात उपग्रह प्रक्षेपण कॅब बुक करण्याएवढे सोपे होईल. एवढेच नाही तर पेलोड सेगेंटमध्ये सर्वात कमी खर्चिक रॉकेट असेल, असा दावा कंपनीने केला आहे.