‘भुदरगड’मधील ग्रामपंचायत निवडणुकीत संमिश्र आघाड्यांना यश : बहुतांश ठिकाणी शिवसेनेची बाजी.

0
727

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जाहीर झालेल्या  निकालाचा कल पाहता आ. प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने बहुसंख्य ठिकाणी विजय मिळवला. पाठोपाठ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पक्षानेही विजयश्री संपादन केली आहे. नंतर भारतीय जनता पार्टी, काँग्रेस अशा क्रमाने विजयाची माळ या पक्षांच्या गळ्यात पडली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी संमिश्र आघाड्या विजयी झाल्या आहेत.

आमदार प्रकाश आबिटकर,  उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी सुमारे २७ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकल्याचा दावा केला आहे, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील यांनीही २६ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहूल देसाई व नाथाजी पाटील यांनी २० ठिकाणी भाजपची संयुक्त सत्ता आली आहे. भाजपचे विविध गावांत मिळून एकूण ६१ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहेत. खानापूरची लढाई ही स्थानिक पातळीवरील होती, त्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील यांचा कोणताही सहभाग नाही. किंवा त्यांच्या पोष्टरचा कोणीही कोठेही उल्लेख केलेला नाही. विरोधकांनी सत्ता मिळवण्यासाठी उचललेले ते एक पाऊल होते.

शिवसेनेकडे खानापूर, कलनाकवाडी, बसरेवाडी, एरंडपे खेडगे, बारवे, डेळेचिवाळे, नवले, नितवडे, भेंडवडे, बामणे, पंडिवरे मेघोली, शिवडाव अशा ग्रामपंचायती निर्विवाद आल्या आहेत. यामध्ये अजूनही काही ग्रामपंचायती या शिवसेनेकडे आल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आंबवणे, फणसवाडी, नाधवडे, तांब्याचीवाडी, बेडिव म्हसवे, म्हासरंग, भालेकरवाडी, पळशिवणे, बिद्री, पेठ शिवापूर, सोनुर्ली, मिणचे या ग्रामपंचायती आल्याचे दिसून येत आहे.

आदमापूर, नवरसवाडी, गंगापूर, मोरेवाडी, नांगरगांव, नागणवाडी,  बेगवडे, ममदापूर, मानी मठगांव, सालपेवाडी व लोटेवाडी, पाळ्याचाहुडा, दोनवडे, हेळेवाडी, नादोली ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत संमिश्र आघाड्यांना यश मिळाले आहे.

गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच़्या आवारात असलेल्या क्रीडा संकुलात शांततेत मतमोजनी पार पडली. साऱ्या परिसराला पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने छावणीचे स्वरूप आले होते. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी नेटके नियोजन केले होते.