श्रीधर वि. कुलकर्णी

लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव सुरू केला त्या गोष्टीला आता शतकापेक्षा अधिक काळ लोटला आहे. घरोघरी गणपती बसविण्यामागे समाजातील ऐक्य साधण्याबरोबरच घरात हे संस्कार होत राहावेत, हाही मोठा उद्देश लोकमान्य टिळकांचा होता. घराचे घरपण व समाजाचे सामाजिक स्वरूप एकत्रितपणे अबाधित राहावे हा त्यामागचा आणखी एक व्यापक हेतू होता. गणपतीचे समाजातील सर्वमान्य स्थान हेरून त्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप देता येणे सहजशक्य आहे व त्यातून राष्ट्रीय एकता साधता येईल, या विचारामागे त्यांची मोठी दूरदृष्टी होती यात शंकाच नाही.

‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची..’ म्हणत ‘त्याला’ मनोभावे ओवाळताना मन समाधानाने भरून जाते. ‘त्याचं’ ते ‘लंबोदर-पितांबर’ असं मनोहारी रूप पाहून ‘त्याच्या’ स्वागतासाठी केलेली धावपळ, मखरासाठी जागवलेल्या रात्रींचा सगळा शिणवटा पार पळून जातो. निरांजनाच्या त्या प्रकाशात ‘तो’ अधिकच आपलासा वाटू लागतो. विविध अभिजात कलांचं सादरीकरण ‘त्याच्या’समोर सादर केले जाते. काहीसा असाच आहे आजच्या तरुणाईच्या मनातला गणपती. परंपरांचं भान राखणारा. प्रदूषण टाळून पर्यावरणस्नेह जपणारा. लाखोंच्या उलाढालींचा वापर सकारात्मक कामासाठी व्हावा, अशी आस बाळगणारा. असा मनातला गणेशोत्सव जनात येणे हे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी तरुणाईने सोडायला हवीय भंपक मनोरंजनाची कक्षा नि करायला हवीय बुद्धीदेवतेची डोळस आराधना. त्यासाठी करू या बाप्पाकडे एकच प्रार्थना की, ‘सुबुद्धी दे गणनायका..’

मूर्तीचा आकार केवढा असावा याला कोणतीही मोजपट्टी लावल्याचा संदर्भ कुठेही आढळत नाही. केवळ आमची मूर्ती सर्वात जास्त उंच किंवा सर्वात मोठी हे सांगण्याच्या हव्यासापोटी सार्वजनिक गणेश मूर्तींचा आकार व उंची वाढत गेली. त्यात इतकी स्पर्धा सुरू झाली की मग ती रोखण्यासाठी सरकारला कायदा करावा लागला! प्रत्येक बाबतीत लालबागच्या राजाची किंवा दगडूशेठ हलवायाच्या गणपतीशी तुलना करावयाची खरे तर गरज नसते, पण तशी ती केली जाते! सार्वजनिक उत्सवातील मूर्तींची उंची फारशी मोठी न ठेवता त्या उत्सवाची उंची कशी वाढविता येईल हे अधिक महत्त्वाचे आहे. मूर्ती छान असावी, हे वाटणे साहजिक असले तरीही त्यासाठीच्या काही मर्यादा आपणच ठरवल्या पाहिजेत.

गणेशोत्सव हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला तो लोकांनी एकत्रित येण्यासाठी, संघटित होण्यासाठी; पण आज तसे दिसत नाही. आजची तरुण पिढी गणेशोत्सवाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातेय. गणेशोत्सवामध्ये तरुणाईचा सहभाग जास्त आहे. कर्णकर्कश संगीत, दरवर्षी मूर्तीची उंची वाढवणे, गणपती नवसाला पावतो, असा गवगवा करणे, असे प्रकार होत आहेत. गणपती हा एक प्रकारे ब्रॅण्ड होऊ लागलाय.

सार्वजनिक मंडळांनी गणपतीच्या देखाव्यापासून ते दागिन्यांपर्यंत वायफळ खर्च करण्यापेक्षा काहीतरी चांगले काम करावे. अनाथाश्रमाला मदत करावी, गरिबांना दानधर्म करावा, अशी मते जाणकार मंडळींकडून व्यक्त होत असतात. काही मंडळे विधायक उपक्रम राबवतात, हेही दुर्लक्ष करता येणार नाही. उत्सव साजरा करताना भावनेच्या भरात वाहून जाणे योग्य नाही. गणेशोत्सवाचे बाजारीकरण न करता आपल्या परंपरेला साजेसा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे. यासाठीच सर्वांना ‘सुबुद्धी दे गणनायका….!!