गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या महामारी नंतर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्य शासनाने नियमांना अधीन राहून राज्यातील सर्व दैनंदिन व्यवहार सह चित्रपटगृहे, शाळा, पर्यटन स्थळे आणि मंदिरे उघडण्यास टप्प्या-टप्प्याने परवानगी दिली आहे. गडहिंग्लजमधील साने गुरुजी वाचनालय येथील मुला-मुलींच्या साठी असलेली अभ्यासिका सुरु करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज तालुक्यातील अनेक मुला-मुलींनी या वाचनालयात अभ्यास करून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे आणि गडहिंग्लज तालुक्याचे नाव देश पातळीवर नेले आहे. असे असतानाही लॉकडाऊन नंतर सर्वच सुरळीत होण्याचा प्रयत्न होत असतानाच ही अभ्यासिका अद्यापही बंद आहे. त्यामुळे मुला-मुलींनी ना आपल्या हक्काच्या अभ्यासीके पासून वंचित रहावे लागत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक बाबतीत होणारी परवड लक्षात घेता सदर अभ्यासिका लवकरात लवकर सुरू करावी.

आपण आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा करतो. तसे न झाल्यास मुलामुलींच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यानंतर होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील.असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी निवेदनातून दिला आहे.