कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय सहल म्हटले की आपल्याला आपली लालपरी म्हणजेच महामंडळाची बस आठवते; पण गेल्या काही वर्षांमध्ये शालेय सहलींसाठी खासगी आराम बसेस वापरल्या जात आहेत. परिणामी एस.टी. महामंडळाला नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच यावर उपाय म्हणून आता शालेय सहलीसाठी एस.टी. महामंडळाकडून शाळांना प्रासंगिक करार बसऐवजी शालेय सहल विशेष बससेवा मिळणार आहे.

एसटी महामंडळाची शालेय सहलीसाठी लालपरी मिळणारच आहे; पण त्याचबरोबर वातानुकूलित आरामगाडी देखील शालेय सहलींसाठी देण्यात येणार आहे. शालेय सहलींवेळी विद्यार्थ्यांना एस.टी.च्या’शिवशाही’ या आराम बसमधून सुरक्षित व आरामदायी प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सहलीच्या आनंदात नक्कीच वाढ होणार आहे. या शालेय सहलीच्या विशेष सेवेला चांगल्या प्रतिसादामुळे एसटीचे उत्पन्न वाढायला देखील चांगली मदत होऊ शकते.