मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या  दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज (सोमवार) कृष्ण कुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  

यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रियेवर मार्ग कसा काढता येईल,  प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेली, तर कॉलेज कधी सुरु होणार?  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न, काही विद्यार्थ्यांची अ‍ॅडमिशन झाली आहेत, त्याचे काय होणार या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. काही पालकांचा फी वाढीचा सुद्धा मुद्दा होता. राज्य सरकारच्या जीआर नंतरही काही शाळांनी फी वाढ केली आहे,  यावरही चर्चा करण्यात आली.

दरम्यान,  कोचिंग क्लासेस सुरु करण्याच्या मागणीसाठी आज कोचिंग क्लासेसचे मालकही राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. याआधी जीम चालक, डब्बेवाले, मूर्तिकार आणि कोळी महिलांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली होती.