कतार (वृत्तसंस्था) : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. अर्जेंटिना, क्रोएशिया, मोरोक्को आणि फ्रान्स या चार संघांनी उपांत्य फेरीमध्ये धडक दिली आहे. उर्वरित २८ संघांनी घरची वाट धरली आहे. बुधवारी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात मोरोक्को आणि फ्रान्स आमने-सामने असतील. यंदाच्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना १८ डिसेंबर रोजी होणार आहे. 

फिफा सुरू होण्याआधीपासूनच काही दिग्गज फुटबॉलर्सबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, केलियन एमबाप्पे, हॅरी केन, रॉबर्ट लेवांडोस्की आणि नेमार ज्युनियर यांचा समावेश होता. आता उपांत्य फेरीमध्ये चॅम्पियन बनण्याच्या शर्यतीत यापैकी फक्त लिओनेल मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे उरले आहेत. केन, रोनाल्डो, नेमार आणि लेवांडोस्की या उर्वरित तीन खेळाडूंचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

पोर्तुगालकडून खेळणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो या दिग्गज खेळाडूचे विश्वचषकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. रोनाल्डोच्या नेतृत्त्वात खेळणारा पोर्तुगालचा संघ सेमीफायनलही गाठू शकला नाही. पोर्तुगालचा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मोरोक्कोकडून १-० असा पराभव झाला. या विश्वचषकात स्वतः ख्रिस्तियानो रोनाल्डोही फारशी कामगिरी करु शकला नाही. रोनाल्डोने संपूर्ण स्पर्धेत घानाविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी किकद्वारे हा गोल केला होता.

लियोनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे स्पर्धेत फॉर्मात आहे. ज्यामुळे त्यांचे दोन्ही संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाले आहेत. दोन्ही खेळाडू ‘गोल्डन बूट’ शर्यतीत आघाडीवर आहेत. २३ वर्षीय एमबाप्पेने आतापर्यंत पाच सामन्यांत पाच गोल केले आहेत. एमबाप्पेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक गोल केला आणि डेन्मार्क आणि पोलंडविरुद्ध प्रत्येकी दोन गोल केले.

त्याचबरोबर ३५ वर्षीय मेस्सीने पाच सामन्यांत चार गोल केले आहेत. मेस्सीने सौदी अरेबिया, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्ध गोल केले. अर्जेंटिना आणि फ्रान्स या संघांनी आपापल्या उपांत्य फेरीतील सामने जिंकल्यास अंतिम फेरीत मेस्सी आणि एमबाप्पे यांच्यात रंजक लढत होईल.