गारगोटीसह भुदरगड तालुक्यात कडकडीत बंद…

0
574

गारगोटी (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विकेंड लॉकडाऊनच्या शासनाचे आदेशाचे गारगोटीसह भुदरगड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. नेहमी गजबजलेल्या परिसराने आज बंद दुकाने, निर्मनुष्य रस्ते, शांतता  अनुभवली.

शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली होती, दोन दिवसासाठी लागणारा बाजार लोकांनी आदल्या रात्रीच खरेदी केला. आज विकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी सकाळी तालुक्यातील सर्वच दुकाने उघडलीच नाहीत, किरकोळ मेडिकल दुकाने व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंदच होती.  भुदरगड पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना हटकले.

नेहमी गजबजलेल्या क्रांती चौक, एस टी स्टँड परिसरात तसेच मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे रस्त्यावर एकही वाहन दिसत नव्हते. तरीही काही वाहने गारगोटी शहरात प्रवेश करू नयेत, यासाठी भुदरगड पोलिसांनी गारगोटी प्रवेश मार्गावर कडक नाकाबंदी केली होती. कोल्हापूर मार्गावर खानापूर हद्दीजवळ, आकुर्डे रस्त्याला पोलिसांनी नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे आज दिवसभर या मार्गावर पोलीस थांबून होते.