टोप (प्रतिनिधी) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर शिरोली, टोप परिसरातील नागरिकांनी  कडकडीत बंद पाळून लॉकडाउनला चांगला प्रतिसाद दिला. अत्यावशक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा रात्री ८ वाजल्यापासून बंद करण्यात आल्या.

तर आज (शनिवार) सकाळपासून शिरोली, नागांव, मौजे वडगांव, टोप, संभापूर, कासारवाडी परिसरात शुकशुकाट होता. अत्यावश्यक सेवा वगळता खाद्यपदार्थ, किराना मालाची दुकाने बंद आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गावर तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू आहे. परिणामी वीकेंड लॉकडाऊनच्या निमित्ताने गेल्या वर्षीच्या कडक लॉकडाउनच्या आठवणी ताज्या झाल्या असून नागरिक काळजी घेताना दिसत आहेत. 

शिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अतुल लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई केली जात आहे. तर लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नका, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.