पूजा चव्हाण प्रकरण : शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त सूचना

0
127

मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड  यांचे नाव समोर आले आहे. हे प्रकरण भाजपने उचलून धरल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे. तर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संजय राठोड यांना सक्त आदेश दिले आहेत. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना राठोड यांना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी राठोड यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारवर याआधीही आरोप कऱण्यात आले आहेत. दिशा सालियनची आत्महत्या, धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप यामुळे सरकार अडचणीत आले होते. यावर पडदा पडत असताना पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे   राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.