महावितरणचा अजब कारभार : एका थकबाकीदारासाठी संपूर्ण गावाची बत्तीच गुल…

0
1483

टोप (प्रतिनिधी) : महावितरण कंपनीने थकित वीजबील असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा चालू केला आहे. यातूनच हातकणंगले तालुक्यातील कासारवाडी येथील एका वीज ग्राहकाचे कनेक्शन बील न भरल्याने काल (शुक्रवार) १२ मार्च रोजी तोडण्यात आले. यामुळे ग्राहक व कर्मचारी या दोघांच्यात वाद झाल्याने वायरमने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा तब्बल ६ तास तोडण्याचा अजब प्रकार केला आहे.

महावितरण कंपनीने दोन दिवसापासून थकित वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याचे मोहीम राबवत आहेत. यातूनच गावातील एका ग्रामपंचायत सदस्याचे वीज बील थकित असल्याने त्यांचे कनेक्शन तोडले. यामुळे या सदस्याने विजबिल तत्काळ भरले व वीज जोडण्याची विनंती केली. पण पुन्हा जोडणी करण्यासाठी आलेल्या महावितरण कर्मचाऱ्याने तोडलेल्या वीज कनेक्शनसाठी आणखी काही रक्कम भरण्यास सांगितले. यावरून दोघात वादावादी झाली. यावरून महावितरणने संपूर्ण गावाचाच वीजपुरवठा खंडित केला.

तब्बल सहा तास गावाला अंधारात ठेवल्याने नागरीकात रोष पहायला मिळत होता तर नियमित वीजबिल भरणाऱ्यांचा संताप अनावर होत होता. घरातील लहान मुलांना व वृद्धांना या लाईट नसल्याने रणरणत्या उन्हाचा खूपच त्रास होत होता. घडलेला प्रकार काही मध्यस्थांनी मिटवल्यानंतर गावात लाईट आली.

पण वीज कंपनीने एका ग्राहकासाठी संपूर्ण गावास वेठीस धरणे हे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.