कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीतून वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर राज्यातील विधानपरिषदेच्या जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला आहे. पक्षाच्या आदेशावरून निवडणूक लढवत होतो, पक्षाच्या आदेशावरून थांबतोय, अशी प्रतिक्रिया माजी आ. अमल महाडिक यांनी आज (शुक्रवार) दिली आहे.

कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे अमल महाडिक यांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. यावर महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मागील अनेक वर्षं महाडिक साहेबांनी या जागेवरून विधान परिषदेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे यंदाही तोडीस तोड म्हणून महाडिक कुटुंबातीलच उमेदवार असावा, अशी पक्षाची आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार पक्षाकडून मला उमेदवारी दिली गेली. त्या अनुषंगाने आम्ही तयारीलाही लागलो होतो. पण आज अचानक माघार घेण्याचा आदेश पक्षाने दिला.

उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा झाल्यापासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले माझे मोठे बंधू माजी खा. धनंजय महाडिक, आ. प्रकाश आवाडे,  आ. विनय कोरे, जयंत पाटील तसेच सर्व ज्ञात-अज्ञात नेते, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, माझ्या पक्षातील सर्व सहकारी मित्र, कुटुंबातील सर्व सदस्य व जीवापाड प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो.  कोल्हापूरच्या जनतेच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर होतो, व यापुढेही असेनच. त्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी संयम राखून पक्षादेशाचा मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.