चिंचवाडमधील समाज मंदिराचे काम थांबवा : जय मल्हार संघटनेचे आमरण उपोषण

0
51

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यामधील चिंचवाड गावातील समाजमंदिर चुकीच्या जागी बांधले जात आहे. कामाचे आदेश देताना व बांधकाम विभागाने काम सुरू करताना जागेची  माहिती घेतलेली नाही. तरी या  जागेची मोजणी करून मगच बांधकाम सुरू करावे, तोपर्यंत हे बांधकाम त्वरित थांबवावे, या मागणीसाठी  जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.  

त्याच बरोबर पूर्वीच्या समाज मंदिराचे असिसमेंटवरील नोंद कमी करणे व खोटे बक्षीसपत्र करून त्याचे क्षेत्र न जुळवता नोंद करून घेणाऱ्या ग्रामपंचायतीवर कलम ३१ नुसार कारवाई करावी, अशी देखील मागणी करून याबाबतचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले  आहे.

ग्रामपंचायतने भूमिअभिलेख यांच्याकडून मोजणी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. तत्पूर्वी या अहवालाची मागणी न करता जिल्हा परिषद सभापती यांच्या दबावाखाली मूळ आक्षेपकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून बेकायदेशीर पत्रांचा आधार घेतला गेला व चुकीच्या ठिकाणी समाज मंदिर बांधून शासनाचा पैसा खर्च केला जात आहे, असे संघटनेने म्हटले आहे.    यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेच्या महिला आघाडी उपाध्यक्षा सुरेखा नाईक, राज मदने,  तानाजी राजपूत आदीसह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.