कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडणी थांबविण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, एकामागोमाग आलेल्या अडचणींमुळे शेतकऱ्यांचे वीज बिले थकीत राहिले. महावितरणने अचानक कारवाईचा बडगा उगारत कृषीपंपांची वीज तोंडायला सुरुवात केल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच नुकसान भरपाई म्हणून अगदी तुटपुंजी रक्कम जाहीर केली आहे.

तरी तोडलेली वीज कनेक्शन पूर्ववत करावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढू, असा इशारा जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर यांनी दिला आहे. तसेच वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना हफ्ते पाडून देण्यात यावेत. रब्बी, खरीप हंगामाच्या सुगीप्रमाणे त्याची मुदत असावी. प्रत्येक शेतकऱ्याच्या वीज वापराचे कन्झ्युमर पर्सनल लेजर तपासून वीज देयके सुधारित करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात काणेकर, शरद पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.