कोल्हापूर (प्रतिनिधी) : व्यापार व व्यवसाय प्रदीर्घ बंद राहिल्यानंतर सणासुदीच्या काळात व्यापारी व दुकांदारामध्ये उत्साह आहे. त्यातच छोट्या छोट्या दुकानदारांवर कोविड नियमावलीच्या नावाखाली होत असलेली अतिरेकी कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांचेकडे केली. शिष्टमंडळाने आयुक्तांकडे आपल्या व्यथा मांडल्या.

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड व ताराबाई रोड ही एक मुख्य बाजारपेठ आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे तसेच दिवाळी जवळ आल्यामुळे या बाजारपेठांत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते आहे. यावेळी फिरते पथक जाणून-बुजून ठरवून काही व्यावसायिकांवर व व्यापार्‍यांवर वारंवार कारवाई करत असल्याचे निदर्शनास आले आहे” असा आरोप अध्यक्ष सचिन जाधव यांनी केला.

अमित माने, विपुल मुळे, तेजस चिटणीस यांनीही कारवाई करतानाही जाणून-बुजून व हेतुपुरस्सर काही ठराविक व्यावसायिकांना त्रास दिला जात आहे. पथकामध्ये असलेल्या मार्केट विभागाच्या गीता लखन व कर्मचारी यांचेकडून व्यावसायिकांना अवमानकारक भाषेचा वापर केला जातो. यातून व्यापार्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष वाढतो आहे, असे सांगितले.

फिरत्या पथकाला अशाप्रकारे जाणून-बुजून, हेतुपुरस्सर, दंडाचे उद्दिष्ट गाठण्याच्या उद्देशाने अन्याय्य  कारवाई करण्यापासून रोखावे अन्यथा या असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा इशारा भाजपाचे गटनेते अजित ठाणेकर यांनी दिला. यावर आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पथकांना दंडाचे कोणतेही उद्दिष्ट दिलेले नाही,  उलट दंडापेक्षा जनजागृती गरजेची आहे याबाबत पथकांना सूचना करण्यात येतील आणि अन्याय्य कारवाई होत असेल तर त्या कर्मचाऱ्यांना ताकीद दिली जाईल असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.