गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्र्यांनी लाल दिव्याच्या गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी चर्चा करावी. त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, पण हेच काम मी करत असल्याने त्यांच्या पोटात दुखत आहे, अशी खरमरीत टीका जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नांव न घेता केली.  

शिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने घाटगे आज (रविवार) गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे, करंबळी येथे आले होते. यावेळी त्यांनी शेतीच्या बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात अफवा पसरवल्या जात आहेत. कृषी विधेयक अत्यंत उपयोगी असून यातून शेतकऱ्यांचा फायदाच होणार आहे. बाजार समित्या बरखास्त होणार, अशी अफवा पसरवली पण यात काहीही तथ्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भूलथापांना बळी पडू नये.

सध्या आंबेओहोळचा प्रश्न गाजतोय, अजून ही धरणग्रस्तांना जमिन, पैसे मिळाले नाहीत, फडणवीस सरकारने २२७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ते कुठे गेले, असा सवाल त्यांनी यावेळी केला. शिवार संवाद यात्रेला विरोधकांकडून पर्यटन दौरा असे संबोधले जाते, पण या टीकेकडे मी लक्ष देत नसल्याचे घाटगे म्हणाले.