कोल्हापूर (प्रतिनिधी) : गृहराज्यमंत्री  सतेज पाटील यांनी वयाची पन्नाशी गाठली तरी काँग्रेसने अजून त्यांना राज्यमंत्री ठेवले असल्याची खंत खुद्द राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. हे त्यांचे वक्तव्य अर्थातच ना. सतेज पाटील यांच्या राजकीय  सक्षमतेला अनुसरुन होते.  पण यातूनच ना. अजित पवार यांनी सतेज पाटील यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर तर दिली नाही ना, अशीही चर्चा यामुळे झाली.

निमित्त होते पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातील आकुर्डी येथील ज्ञानशांती शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डी. वाय. पाटील शिक्षण समुहाची ही संस्था असल्याने गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनीच  त्यांना निमंत्रित केले होते. या कार्यक्रमात ना. पवार यांनी ना. सतेज पाटील यांच्या प्रभावशाली राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना त्यांना अद्याप राज्यमंत्री ठेवल्याची कोपरखळी थेट ‘काँग्रेस’ पक्षालाच मारली. यातून त्यांनी राष्ट्रवादीत असता तर कॅबिनेट मंत्री झाला असता, असे त्यांना सुचवायचे होते का ? अशी चर्चा या निमित्ताने झाली.

या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ना. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची निवडणूक आपल्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचे स्पष्ट केले. येथील अनेक भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट करून त्यांनी भाजपला हादरा दिला. जरंडेश्वर कारखान्यांच्या तपास ईडी करीत आहे. त्यातून सत्यच बाहेर येईल असे त्यांनी सांगितले. ना. छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना दोन वर्षाचा कारावास भोगावा लागला. नंतर ते निर्दोष मुक्त झाले. पण त्यांना कारावास भोगावा लागला. त्याचे काय असा सवालही त्यांनी यानिमित्ताने केला.