कोल्हापूर (प्रतिनिधी) : रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या रक्षाबंधनानिमित्त भगिनींनी भावाला ओवाळून राखी बांधली. बहिणीला भेटवस्तू देऊन भावानेही खुश केले. अशा प्रकारे ठिकठिकाणी रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला; परंतु कोल्हापूरच्या टाकाळा येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे झाले.

उपशहर प्रमुख विशाल देवकुळे यांना त्यांच्या भगिनी रूपाली यांनी टाकाळा येथील आपल्या माहेरी येऊन विशाल देवकुळे या धाकट्या बंधूंना राखी ऐवजी भगवे शिवबंधन हातात बांधले आणि ओवाळणी म्हणून विशाल यांच्याकडून ‘यापुढे तू या शिवबंधनांचा सन्मान राखून जीवनाच्या अंतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या मातृशिवसेनेशी निष्ठावंत राहशील’ असे अभिवचन घेतले. हे भावा-बहिणीचे नातेसंबंध दृढ करणारे रक्षाबंधन पार पडले, खरे पण अशा पद्धतीने झालेल्या निष्ठेची ओवाळणी मागणाऱ्या भगिनीच्या अनोख्या रक्षाबंधनाची राजकीय सर्वत्र चर्चा होत आहे.