कोल्हापूर (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारने गुंडाळलेली वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याचा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने विकासाचा मार्ग पुन्हा मोकळा केला आहे, अशा शब्दात भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे. केवळ राज्यपालांविषयीचा आकस आणि त्यांच्या अधिकारावर गदा आणण्यासाठी ठाकरे सरकारने राज्याच्या विकासालाच खीळ घातली आणि वसुलीचा एकमार्गी कार्यक्रम राबविला, अशी टीकाही त्यांनी केली.

विकास कार्यक्रमांसाठी निधी वाटपाचे अधिकार राज्यपालांच्या हाती गेले, तर वसुली आणि वाटाघाटींचे मार्ग बंद होतील या भीतीने ठाकरे सरकारने वैधानिक विकास मंडळाची मुदत वाढविण्यासाठी प्रयत्न केले नाहीत असा आरोप करून जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले की, ठाकरे आणि राज्यपाल यांच्यातील कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्याचा विकास दोन वर्षे रखडला असून, विकासाचा अनुशेष आणखी वाढला आहे. एप्रिल २०२० मध्ये वैधानिक विकास मंडळांची मुदत संपल्यानंतर ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणे टाळले. त्यामुळे दोन वर्षांत मराठवाडा, विदर्भ, आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागले नाहीत.

ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासास खीळ घातलेल्या विकास प्रकल्पांची व त्यामुळे त्यांच्या सत्ताकाळात झालेल्या अधोगतीची माहिती राज्याला देण्यासाठी श्वेतपत्रिका जारी करा, अशी मागणीही जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी शिंदे सरकारकडे केली. वैधानिक विकास मंडळे पुन्हा स्थापन करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारने रोखलेला विकासाचा गाडा आता रुळावर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.