महाराष्ट्रात ३ डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन..

0
43

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील सहा दिवसांपासून निदर्शन करीत आहेत. कृषी कायदा रद्द करा, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतमालाला हमीभाव द्या, अशा घोषणा शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांचे हे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही घेतला आहे. महाराष्ट्रातही ३ डिसेंबर रोजी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर केंद्र सरकार दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून, शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले चार दिवस बसले आहेत. हे आंदोलन देशातील सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची तयारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने केली आहे.

राज्यातील आंदोलन तीव्र करण्यासाठी आयोजित बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेऊन आंदोलन तीव्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.