गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात मोफत कोरोना लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. पण लसीकरणासाठी रुग्णालयातील अत्यल्प कर्मचारी तसेच नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लस न घेताच नागरिकांना माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यासाठी गडहिंग्लज मनसेने गटविकास अधिकारी शरद मगर यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे सरकारने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या स्पष्ट सूचना केल्या असतानाच गडहिंग्लज शहरात मात्र प्रशासनाने या सूचनेला फारसे गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. यासाठी कोरोना लसीचा पहिला तसेच दुसरा डोस देण्यासाठी स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करावी. नोंदणी करण्यासाठीची तसेच लसीकरणाची केंद्रे वाढवण्यात यावीत, याचबरोबर लसीकरणाचा कक्ष हा दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे वयोवृद्ध लोकांना येजा करण्यास जिकरीचे पडत आहे.

तरी रुग्णालय प्रशासनाने लसीकरणाची व्यवस्था तळ मजल्यावर करावी.  लसीकरण कक्षाकडे जाणारा मार्गावर दिशादर्शक फलक लावून त्यावरती लसीकरणची वेळ अधोरेखित करावी. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर नागेश चौगुले, प्रभात साबळे, अविनाश ताशीलदार, अनिता पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.