कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शहरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्या आहेत. याबाबत मावळते महापौर निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, शिवसेना गटनेता राहुल चव्हाण, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांच्या शिष्टमंडळाने आज प्रशासक कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन या त्रुटी दूर करण्याबाबत निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, हरकतीच्या अंतिम तारखेला मुदतवाढ द्यावी. सन २०१५ च्या अंतिम यादीचा बेस वापरावा. नागरिक आणि नगरसेवकांनी दिलेल्या हरकतीच्या दुरुस्तीची किंवा त्याच्या निकालाची प्रत अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी देण्यात यावी. २०१५ च्या मतदार याद्याप्रमाणे सिरीयल क्रमांक तपासणी करण्यात यावी. हरकती देण्यासाठी वॉर्ड ऑफिसवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक त्वरित जाहीर करावेत.

या शिष्टमंडळात वृषाली कदम, सरिता मोरे, उमा बनछोडे, अर्जुन माने, सचिन चव्हाण, प्रकाश गवंडी यांचा समावेश होता.