शिरोळ (प्रतिनिधी) :  हातकणंगले, शिरोळ तालुका भागांमध्ये विदेशी, हातभट्टी, दारूची विक्री खुलेआम विनापरवाना चालू आहे. तसेच विदेशी आणि हातभट्टी दारूचा साठा केल्याचे संघटनेच्या निदर्शनाला आले आहे.  हा मद्याचा साठा आणि विक्री ही संबंधित अधिकारांच्या आशीर्वादाने चालत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. या संबंधीचे निवेदन बहुजन दलित महासंघाने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाला दिले.

निवेदनात म्हटले आहे की, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बऱ्याच भागामध्ये काबाड कष्ट आणि हातावर पोट असणारी जनता आहे. त्यांची आथिर्क लूट व अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून या भागातील तरुणवर्ग व्यसनाधीन झाले आहेत. या तालुक्यातील चालू असलेले विनापरवाना दारू विक्री लवकरात लवकर बंद करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संबंधित कार्यलयासमोर करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला.

या निवेदनावर महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे, शिरोळ तालुकाध्यक्ष जॉली तिवडे, इचलकरंजी शहराध्यक्ष बादल हेगडे, शिरोळ तालुका कार्याध्यक्ष उमेश तिवडे,  इचलकरंजी शहर उपाध्यक्ष नारायण आगवणे ,जयसिंगपूर शहर अध्यक्ष  अमोल कांबळे आदींच्या सह्या आहेत.