कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडेकर यांनी ‘वुमन्स डॉक्टर विंग’ ही संकल्पना आणली. या विंगची ११ वी राज्यस्तरीय वैद्यकीय परिषद शनिवारी (दि.१६) कोल्हापूर येथील हॉटेल सयाजी येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. “वुमन टुडे अँड टूमारो” अशी संकल्पना या परिषदेची असणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्षा तसेच कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा व परिषदेच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव यांनी दिली.

परिषदेचे उद्घाटन ‘आयएमए’चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर डॉ. रवी वानखेडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. दोन दिवसीय या वैद्यकीय परिषदेत महिलांना फायदेशीर अशा कायदेविषयक, तंत्रज्ञान, प्रबोधनात्मक विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत, अशी माहिती परिषदेचे संघटक डॉ. अशोक जाधव यांनी यावेळी दिली.

तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘नारीशक्ती आणि देशभक्ती’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे  वुमन्स डॉक्टर विंगच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा डॉ. नीता नरके यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस परिषदेच्या संघटक सचिव डॉ. गीता पिल्लई, डॉ. विद्युत शहा, सहसचिव डॉ. ए. बी.पाटील, डॉ. उन्नती सबनीस, डॉ.अरुण धुमाळे, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. देवेंद्र जाधव आदी उपस्थित होते.