सरकारचा वीजग्राहकांना जोराचा झटका : उद्यापासून कापली जाणार थकबाकीदारांची कनेक्शन्स

0
48

मुंबई (प्रतिनिधी) : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफीसाठी राज्यात अनेक आंदोलने झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी हा मुद्दा अडचणीचा ठरणार हे लक्षात घेऊन २ मार्च रोजी थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास  स्थगिती दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. मात्र, आज (बुधवार) अधिवेशनाची सांगता झाल्यावर ही स्थगिती उठविण्यात आली असून ती फक्त अधिवेशन संपेपर्यंतच होती, असे पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे उद्यापासून थकबाकीदारांची कनेक्शन्स कापली जाणार आहेत. अधिवेशन संपताना वीज ग्राहकांना मोठा झटका लागला आहे.

कोविड काळात लॉकडाऊन लागल्यानंतर या दरम्यान लोकांना भरमसाठ बिलं आली होती.  लोकांना सरासरीवर आधारीत वीज देयके देण्यात आली होती. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात बिलं आल्याने राज्यातील जनतेने संताप व्यक्त केला होता. वीज बिलमध्ये सवलतीबाबत घोषणा करुन नितीन राऊत यांनी यू टर्न घेतला होता.

२ मार्च रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेत महावितरणाव्दारे वीज ग्राहकांची जोडणीबाबत अधिवेशन कालावधीत चर्चा होण्याच्या आधीन राहून थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यास  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थगितीचे आश्वासन दिले होते. मात्र, महावितरणची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली असल्याने थकबाकीदार ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यासंदर्भात देण्यात आलेली स्थगिती सभागृहाच्या परवानगीने उठविण्यात येत असल्याची घोषणा आज करण्यात आली. याचा अर्थ आता वीज बिल न भरणाऱ्या नागरिकांचं वीज कनेक्शन कापलं जाणार आहे.